पश्चिमी चक्रवाताचा परिणाम…!राज्यात कडाक्याची थंडीने जोर धरला.
पुणे: राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जोर धरू लागली आहे. या विषयी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव हिमालयीन भागात वाढल्याने उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे या भागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी राज्यात पुन्हा वाढली आहे. शुक्रवारी (दि.03) राज्यात औरंगाबाद शहराचे किमान तापमान 9.6 अंशांपर्यंत घसरले, तर पुणे शहराचे किमान तापमान 11.5 अंशांवर आले होते.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून थंडी गायब झाली होती. या परिणामामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागांत पावसानेदेखील हजेरी लावली होती. पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.